संत तुकाराम महाराजांची माहिती : Sant Tukaram Maharaj Information In Marathi

महाराष्ट्राला समृद्ध अशी संत परंपरा लाभली आहे. यामध्ये वारकरी संत परंपरेचे अनन्यसाधारण महत्व आहे. “ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ||” यानुसार महाराष्ट्रातील संत परंपरेला परमोच्च स्थानावर घेऊन जाण्याचे काम ज्यांनी केले असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना सर्वप्रथम वंदन करून त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा आजच्या तुकाराम महाराजांची माहिती( Tukaram Maharaj Information In Marathi) या लेखातून घेऊया

वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष सर्वजण करतात. तुकाराम महाराजांनी ‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंगातून ईश्वर भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. त्यांनी वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा निर्माण करण्याचे काम केले. 17 व्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. चला तर जाणून घेऊया संत तुकाराम महाराज यांचे चरित्र…….

Sant Tukaram Maharaj Information in Marathi
Sant Tukaram Maharaj Information in Marathi

बालपण 

संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन म्हणजेच 17 व्या शतकातील संत व कवि होते. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1608 माघ शुद्ध पंचमी, शा. शके 1530, युगाब्द 4709 ला महाराष्टातील पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी झाला. असे असले तरी त्यांच्या जन्मतारखेबाबत संशोधकामध्ये मतभेद असल्याचे दिसते. तुकाराम महाराजांच्या जन्मवर्षाबाबत 1568, 1577, 1590 आणि 1608 ही चार संभाव्य वर्षे सांगितली जातात. 

तुकाराम महाराजांच्या घरीच विठ्ठल रखुमाईचे मंदिर असल्याने लहानपणापासूनच त्यांच्या मनावर भजन, कीर्तन, प्रवचनातील शिकवणीचे संस्कार झाले. तसेच सावकारकी व्यवसाय असल्याने लहानपणीच त्यांना लिहणे, वाचणे, गणित यांसारखे शिक्षण मिळाले होते. महाराजांच्या अभंगनातून त्यांना खेळाची प्रचंड आवड असल्याचे दिसते.

Read More Biographical Blog

कुटुंब ( Family)

तुकाराम महाराज यांचे मोरे घराणे व अंबिले आडनाव होते. ते वाणी समाजातील होते. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई होते. तुकाराम महाराजांचे सावजी हे थोरले बंधू तर कान्होबा हे धाकटे बंधू होते. तसेच महाराजांना दोन बहिणी होत्या. तुकाराम महाराजांचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पत्नीचे नाव रखुमाई होते. पण त्यांचे अवेळी निधन झाल्याने तुकाराम महाराजांचा द्वितीय विवाह पुण्यातील आप्पा गुळवी यांची कन्या जिजाईसोबत झाला. यांनाच आवली असे देखील म्हणले जात असे.

Buy : Sant Tukaram Biography Book

तुकाराम महाराजांना नारायण व महादेव हे दोन पुत्र आणि भागीरथी व काशी या दोन कन्या होत्या. महाराजांचे थोरले बंधू सावजी हे विरक्त वृत्तीचे असल्याने व नंतर त्यांनी घर त्यागल्याने घराची सर्व जबाबदारी महाराजांवर होती. त्यांचा महाजनी म्हणजेच एकप्रकारे सावकारी हा परंपरागत व्यवसाय होता. पण महाराजांनी सर्व कुळांची कर्जे माफ करून विठ्ठलनामाचा ध्यास घेतला होता.

कार्य 

श्री केशव चैतन्य हे तुकाराम महाराज यांचे गुरु होते. 1630-31 मध्ये प्रखर असा दुष्काळ पडला होता. दुष्काळाची झळ सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसली होती. अनेक जनावरे, माणसे मृत्यूमुखी पडली. शेतीचे नुकसान झाले होते. अशा परिस्तिथीमुळे महाराजांचे मन अस्वस्थ झाले होते. त्यांनी त्यांच्याकडील सर्व कुळांची कर्जे माफ करून त्यांची सावकारी पाशातून मुक्तता केली. 

त्यानंतर या सर्व वेदनांमधून दुःखामधून मुक्तता मिळावी या हेतूने महाराजांनी भंडारा डोंगरावर उपासना सुरु केली.विठ्ठल भक्तीत स्वतःला वाहून घेतले. या उपासनेतून त्यांना साक्षात्कार म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली. व महाराजांनी उर्वरित सर्व आयुष्य समाजासाठी वाहून घेतले. लोकांना जीवन जगण्याचे मार्गदर्शन करू लागले. यासाठी त्यांनी कीर्तन, प्रवचन, अभंग यांचा आधार घेतला. परमार्थप्राप्तीसाठी नामस्मरण हा सोपा मार्ग महाराजांनी सांगितला.

समाजातील अनिष्ठ प्रथावर टीका केली. धर्मग्रंथातील ज्ञान सर्व स्तरातील लोकांसाठी असल्याचे मत मांडू लागले. त्यांच्या शिकवणीकडे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. यातूनच सालोमालो हे कीर्तनकार, मंबाजीबुवा, देहूगावाचा पाटील, वाघोलीचे रामेश्वरभट यासारख्या समाजकंटकाच्या रोषाचा सामना महाराजांना करावा लागला होता.

शिकवण  

तुकाराम महाराजांनी आपल्या प्रवचनातून, अभंगातून तळगाळ्यातील सर्व सामान्य लोकांना समजेल, त्यांना आकर्षित करेल, त्यांचा उद्धार करेल अशाप्रकारची शिकवण देण्याचे काम केले. त्यांनी भक्ती, समता, ईश्वरसेवेचा मार्ग शिकवीला. कर्मकांडापेक्षा प्रामाणिक भक्तीचा मार्ग सांगितला. यासाठी नामस्मरण उपासनेचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग दाखविला. त्यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली आणि समतेचा संदेश दिला. सर्व लोक समान आहेत. उच्च नीच असा भेदभाव नाही हे सांगितले. निस्सीम भक्तीने ईश्वराची प्राप्ती होती. (Tukaram Maharaj)

देवावर शुद्ध प्रेम आणि श्रद्धा ठेवावी. गरजू लोकांना मदत करावी. प्राणीमात्रावर प्रेम करावे. त्यांची हिंसा करू नये. तसेच त्यांनी सामाजिक सुधारणावर भर दिला. त्यांनी बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून दिली. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज जे लोक संत होते. आणि आजही त्यांची शिकवण मार्गदर्शक म्हणूनच काम करतेय. 

साहित्य 

तुकाराम महाराजांचा(Tukaram Maharaj) काळ मध्ययुगाचा काळ असल्याने त्यांचे साहित्य मूळ स्वरूपात नसले तरी लोकवाणीतुन आजही आपल्यापर्यंत सुस्थितीत आले आहे. सर्वाना तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा माहिती आहेच. यातून आधात्म ज्ञान ओसंडून वाहतेय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अभंग आणि ओवीच्या माध्यमातून महाराजांनी समाजात शिकवणीचा प्रसार केला. तुकारामांच्या अभंग गाथेत 5000 हून अधिक अभंग आहेत. यात सर्वसामान्य लोकांना दुःखमुक्त दैनंदिन जीवन जगण्याचा उपदेश दिला आहे. तसेच धार्मिक ढोंग आणि अंधश्रध्दा यांच्यावर कडाडून टिका केली आहे. मराठी साहित्यात तुकाराम महाराजांच्या अभंग–गाथेने स्थान मिळविले आहे. तुकारामांची गाथा हा आज अनेक प्रबांधांचा अभ्यासाचा विषय झाला आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेला अनन्यसाधारण महत्व आहे.

Read More About Sant Tukaram Maharaj

निर्वाण (Tukaram Maharaj)

तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीया, शालिवहन शके 572, दिनांक 19 मार्च 1650 रोजी वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून साजरा केला जातो. वारकरी संप्रदायात हा दिवस पूज्यनीय व पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी स्वर्गातून पुष्पक विमान येऊन तुकाराम महाराजांना सदेही स्वर्गात घेऊन गेले असे सांगितले जाते. पण याबाबत विविध मतांतरे आहेत. काहींच्या मते समाजकंटकाकडून तुकाराम महाराजांचा खून करण्यात आला. सर्व मते बाजूला ठेवून आपण जगद्गुरू तुकाराम महाराज आजही त्यांच्या अभंगातुन, तुकाराम गाथेतून आपल्यासोबतच आहेत असे मानतो. जरी देहाने उपस्थित नसले तरी त्यांचा वास आजही आपल्या अवतीभोवती आहेत.

अशाप्रकारे तुकाराम महाराजांची माहिती ( Tukaram Maharaj Information in Marathi)  या लेखातून आपण तुकाराम महाराजांचे जीवन, त्यांचे कार्य, शिकवण जाणून घेतली. लेख आवडला असेल तर जरूर कंमेंट करून अभिप्राय द्या. तसेच तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहचवा त्यावर आम्ही नक्की काम करू. आणि अशीच विविध चरित्रे आपल्या मातृभाषेतून मराठीतून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करू.

 या लेखाचा शेवट तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने करूया.

दोष हे जातील अनंत जन्‍मीचे ।पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥ न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥ धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥ न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥ शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥

( टीप:- लेखाच्या सुरुवातीला “ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ||” हा एक अभंग दिला आहे. याबाबत दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह ज्ञानदेवांनी पाया रचला असे मानतो. तर दुसरा मतप्रवाह “नामदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ||” असे मानतो.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top