अनेक संकटांचा सामना करत, जिद्दीने एक एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेणाऱ्या भारताच्या दुसऱ्या महिला व अनुसूचित जमातीतील पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास अत्यंत रोमांचकारी असा आहे. द्रौपदी मुर्मू यांचे जीवनचरित्र (Draupadi Murmu Biography in Marathi) या लेखातून आपण आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणार आहोत. एका सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातून तसेच कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय भारताचा प्रथम नागरिक होण्याचा त्यांनी मिळविला. त्यांचा हा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता. यामध्ये कित्येकदा अपयश आले. अनाकलनीय घटना घडल्या. नैराश्यात जाऊन पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिल्या. हे सर्व खरोखर रोमांचकारी आहे आणि सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. चला तर मग जाणून घेऊया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत…..
जन्म
ओडिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील बडिपोसी या गावी द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी संथाळ या आदिवासी समुदायात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू हे असून ते ग्रामप्रमुख होते. तसेच त्यांचे आजोबा देखील ग्रामप्रमुख होते. त्यांनी बालपणापासून अत्यंत गरिबीची परिस्तिथी अनुभवली आहे.
शिक्षण व नोकरी
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी मोठ्या जिद्दीने मयूरभंज येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1979 मध्ये रमादेवी महिला महाविद्यालय, भुवनेश्वर येथून कला शाखेत पदवी मिळविली. पदवी मिळविल्यानंतर त्यांना ओडिसा सरकारच्या पाटबंधारे विभागात सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. येथे त्यांनी 1979-1983 मध्ये काम केले. त्यानंतर 1994-1997 या काळात त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, रायरंगपूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. (Draupadi Murmu Biography in Marathi)
विवाह
द्रौपदी मुर्मू यांचा श्यामचरण मुर्मू यांच्याशी विवाह झाला. श्यामचरण मुर्मू हे बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये होती. पण दुर्दैवाने 2009 व 2012 मध्ये त्यांच्या दोन्ही मुलांचे (सिपून आणि लक्ष्मण) निधन झाले. तसेच त्यांचे पती यांचे ही अटॅकने निधन याच काळात झाले. सध्या त्यांच्या कुटुंबात फक्त त्यांची मुलगी इतिश्री मुर्मू या आहेत. इतिश्री या ओडिसामधील एका बँकेत कार्यरत आहेत. इतिश्री यांचा विवाह गणेशचंद्र हेमब्रम यांच्याशी झाला असून त्यांना आदिश्री नावाची एक मुलगी आहे.
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे चरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
राजकीय कारकीर्द
द्रौपदी मुर्मू यांनी पदवीनंतर पाट बंधारे विभागात तसेच शिक्षिका म्हणून काम केले. 1997 मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणि इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. स्थानिक पातळीवरील निवडणुकापासून राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना, अत्यंत हलाखीत दिवस व्यतीत केलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे राजकीय क्षेत्रातील यश हे प्रेरणादायी ठरते. द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर रायरंगपूर येथील नगरपंचायत लढवीली आणि त्या नगरसेविका झाल्या. याच नगरपंचायतीच्या 2000 साली त्या नगराध्यक्षा झाल्या. तसेच त्यांना भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी मिळाली होती. मार्च 2000 मध्येच त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्या 2000 पासून 2009 पर्यंत दोनवेळा आमदार होत्या.
Buy : Draupadi Murmu Biography Book
द्रौपदी मुर्मू यांनी 2000- 2004 या कालावधीत भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युतीच्या सरकारमध्ये वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री (2000-2002) तसेच मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास मंत्रीपद (2002-2004) भूषविले. 2007 मध्ये सर्वोत्कृष्ठ आमदार म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 2009 मध्ये लोकसभा निवडणूकीत मयुरभंज मतदारसंघातून त्यांना यश मिळविता आले नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्या सोपविल्या.
18 मे 2015 रोजी द्रौपदी मुर्मू यांची झारखंड राज्याच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. त्या झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. तसेच त्या आदिवासी समुदायातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. त्यांनी 2015 ते 2021 या 5 वर्षाच्या काळात राज्यपाल म्हणून काम केले. (Draupadi Murmu Biography in Marathi)
राष्ट्रपती पदी निवड
1997 मध्ये नगरसेवक पदापासून सुरु झालेला राजकीय प्रवास 2022 मध्ये सर्वोच्च पदापर्यंत म्हणजेच राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहचला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी कडून राष्ट्रपती पदाच्या त्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा हे उमेदवार होते. या निवडणुकीत 6,76,803 इलेक्टोरल मते मिळवून द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आणि भारताच्या 15 व्या राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला. त्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर राष्ट्रपती होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 25 जुलै 2022 रोजी त्यांनी राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. आतापर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपती मध्ये द्रौपदी मुर्मू या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती झाल्या तेव्हा त्यांचे वय 64 होते. तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. (Draupadi Murmu Biography in Marathi)
पुरस्कार
द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या कार्यासाठी देशातील विविध संस्थाकडून तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून ओडिसा विधानसभेकडून निलकंठ पुरस्कार मिळाला आहे. 2023 मध्ये सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच 2024 मध्ये फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.
Read More About Draupadi Murmu Biography in Marathi
द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत काही तथ्ये (Facts)
1) द्रौपदी मुर्मू या अनुसूचित जमातीतील पहिल्या महिला राज्यपाल आहेत.
2) द्रौपदी मुर्मू या अनुसूचित जमातीतील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.
3) प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर राष्ट्रपती भूषविणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
4) द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत.
5) द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भाषिक अनुवादाचे आणि भगवान शिवाचे पुस्तक अशी दोन पुस्तके त्यांच्यासोबत कायम असतात.
6) द्रौपदी मुर्मू या ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या संस्थेच्या अनुयायी आहेत.
अशाप्रकारे द्रौपदी मुर्मू यांचे जीवनचरित्र (Draupadi Murmu Biography in Marathi) या लेखातून द्रौपदी मुर्मू यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट्स बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला कोणत्या व्यक्तीबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही कळवा. Pocketbiography.com ची टीम तुमच्या सूचनावर नक्की काम करेल. तसेच Pocketbiography.com च्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी व्हा….. धन्यवाद!!!
प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1- द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
उत्तर – द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत.
प्रश्न 2- भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर – भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत.
प्रश्न 3- द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?
उत्तर – द्रौपदी मुर्मू ओडिसा राज्याच्या रहिवासी आहेत.
प्रश्न 4- द्रौपदी मुर्मू यांच्या मुलीचे नाव काय आहे?
उत्तर – द्रौपदी मुर्मू यांच्या मुलीचे नाव इतिश्री मुर्मू आहे. त्या बँकिंग क्षेत्रात काम करत आहेत.
प्रश्न 5- द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले आहे?
उत्तर – द्रौपदी मुर्मू यांनी झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले आहे.