संत नामदेव माहिती मराठी : Sant Namdev Information in Marathi 2024 (Free)

तेराव्या शतकातील संत नामदेव हे एक अग्रणी क्रांतिकारक संत होते. इतिहासाच्या दृष्टीने त्यांचा काळ बघितला तर तो महाराष्ट्रातील यादव कालखंडाच्या शेवटचा आणि मुस्लिम कालखंडाच्या सुरुवातीचा काळ होता. त्या काळातील धार्मिक परिस्थितीचा विचार करता हिंदू धर्म हा शब्द प्रचलित नव्हता. त्यामुळे संत नामदेव यांचे अभंग व इतर ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. त्या काळात महाराष्ट्राचा मुख्य धर्म वैदिक धर्म होता. या धर्मांतर्गत चार वर्ण व चार आश्रम व्यवस्था होती आणि ब्राह्मण वर्णाला प्रमुख स्थान होते.

अशा प्रबळ वैदिक धर्म काळात आजच्या काळातील पुरोगामी विचाराने वेगळा आचारधर्म, वेगळी उपासना पद्धती निर्माण करण्याचे काम संत नामदेव यांनी केले. संत नामदेव माहिती मराठी (Sant Namdev Information in Marathi) या लेखातून आपण संत नामदेव यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया संत नामदेव माहिती मराठी….. 

Sant Namdev information in marathi
Sant Namdev Information in Marathi

प्रारंभीक जीवन 

 संत नामदेवांचा जन्म शिंपी समाजात 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी व आईचे नाव गोणाई होते. त्यांचे जन्मगाव पंढरपूर असले तरी त्यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे होते. त्यांच्या कुटुंबाचे आडनाव रेळेकर होते. दामाशेटी व गोणाई यांनी पुत्रप्राप्तीसाठी उपवास व नवस केले होते. म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर नामदेवांचा जन्म नवसाने झालेला होता. असे मानले जाते. नवसाने जन्म झाला असल्याने बालपणी नामदेव हे सर्वांचे लाडके होते.

नामदेवांचे वडील कापडाचे व्यापारी व शिंपी होते. ते उद्योग व्यापारासाठी त्यांचे मूळ गाव नरसी हे सोडून पंढरपूर या तीर्थक्षेत्री आले होते.  यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही समाधानकारक होती. दामाशेटी यांना नामदेव यांनी परंपरागत व्यवसाय शिकून करावा असे वाटत होते. परंतु नामदेवांना त्यामध्ये रस नव्हता. त्यांचे मन विठ्ठल मंदिरात आणि तेथे चालणाऱ्या पूजाअर्चेत आणि ग्रंथ वाचनामध्ये गुंतलेले होते. (Sant Namdev Information in Marathi)

संत तुकाराम महाराज यांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ईश्वर भक्तीचा मार्ग

 नामदेव बालपणापासून जिज्ञासू होते. ते सतत धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व नावलौकिक असणाऱ्या ब्राह्मणांना प्रश्न विचारत असत. पण त्यांच्या प्रश्नाचे कोणीही समाधानकारक उत्तर दिले नाही उलट नामदेव यांना अपमानाचा सामना करावा लागला. कारण नामदेव हे वर्णव्यवस्थेनुसार शूद्र वर्णातील होते. या सर्व परिस्थितीमुळे नामदेव हे विठ्ठल मंदिरात आपला जास्तीत जास्त वेळ घालवू लागले व त्यांनी विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला. यातूनच विठ्ठल भक्तीची काव्य लिहायला लागले. अभंगातून देवाचे रूप, गुण याचे वर्णन नामदेव करू लागले.

त्यांच्या एका अभंगातून आपल्याला असे लक्षात येते की नामदेवांचे गुरु हे ते स्वतःच होते व शिष्यही स्वतःच होते. म्हणजेच स्वतःच स्वतःला उपदेश द्यायचा. तसेच ते खुद्द विठ्ठलालाच आपला गुरु मानत. हळूहळू नामदेवांनी विठ्ठल मंदिरात अभंग गाण्यास सुरुवात केली व ते लोकांना समजून सांगितले. यातून नामदेवांचा नावलौकिक सर्वत्र झाला. त्यांनी स्वतःचा वेगळा भक्तिमार्ग लोकांना शिकविला. शुद्ध आचरण, परोपकार, अहिंसा, शाकाहार, संयम आणि साधे राहणे या गुणांचे नामदेवांनी महत्त्व सांगितले. (Sant Namdev Information in Marathi)

Buy : Sant Namdev Biography Book

वारकरी संप्रदायाची स्थापना 

 ज्ञानदेव आणि त्यांचे भावंडे हे अत्यंत ज्ञानी असल्याचे समजल्यानंतर संत नामदेव यांनी त्यांचे भेट घेतली. यावेळी ही चारही भावंडे नाथ संप्रदायात होती. म्हणजेच ते निर्गुण उपासना आणि योग मार्गाचा अवलंब करत होते. या भावंडांनी नामदेवांनाही योग मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला. यासाठी विसोबा खेचर यांच्या मदतीने निर्गुण उपासनेचा मार्ग नामदेवांना पटवून दिला. नामदेवांना तो पटलाही पण तरीही त्यांनी योग मार्ग स्वीकारला नाही. कारण योगमार्ग हा एका व्यक्तीसाठी उपयोगी असू शकतो समूहासाठी नाही. याउलट नामदेव यांनी ज्ञानदेवांना भक्तिमार्ग स्पष्ट करून सांगितला.

भक्तिमार्ग हा एका व्यक्तीसाठी तसेच समूहासाठी ही उपयोगी असतो हे नामदेवांनी स्पष्ट केले. यामुळेच ही भावंडे भक्तिमार्गाकडे वळली आणि या सर्वांनी मिळून वारकरी संप्रदायाची स्थापना केली असे म्हणू शकतो. नामदेव आणि ज्ञानदेव यांची भेट झाली नसते तर ही चारही भावंडे वारकरी संप्रदायात आली नसती. वारकरी संप्रदाय निर्माण करण्याचे श्रेय नामदेवांचे आहे असे मानू शकतो. संत तुकाराम वारकरी संप्रदाय निर्मितीचे श्रेय संत नामदेवांना देतात. परंतु बरेच लेखक अभ्यासक ज्ञानदेवांना वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आणि नामदेवांना प्रचारक म्हणतात. याबाबत आजही वादविवाद आहेत. (Sant Namdev Information in Marathi)

कार्य 

 वारकरी संप्रदायाचे दैवत हे श्री विठ्ठल आहे असे सांगून विठ्ठलाच्या अनेक कथा नामदेवांनी सर्वप्रथम आपल्या अभंगातून मांडल्या. सर्व वारकरी विठ्ठलाला सखा सांगाती मानतात. ईश्वर प्राप्तीसाठी कोणत्याही ब्राह्मण भटजी किंवा कर्मकांडांची आवश्यकता नसून फक्त भक्तीने ईश्वर प्राप्ती होऊ शकते. हे सर्वप्रथम संत नामदेवांनी सांगितले. हे सांगण्यासाठी नामदेवांनी अभंगांचा आधार घेतला. भक्ती प्रामाणिक असेल तर देव साक्षात तुमच्या मनोकामना पूर्ण करतो असे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम नामदेवांनी केले. तसेच देवाबद्दल असणारे गैरसमज आणि भीती ही देखील नामदेवांनी दूर करण्याचे काम केले. याउलट देव हा कृपाळू आणि भावभक्तीचा भुकेला असल्याचे सांगितले.  याचाच परिणाम म्हणजे भटजी पुरोहित यांच्याकडून सर्वसामान्यांचे होणारे शोषण होण्याचे प्रमाण कमी झाले. तसेच त्यांनी चारही वेद बाजूला करून नाम हाच वेद मानला. तसेच त्यांचा स्वर्ग कल्पना वरही विश्वास नव्हता.

आपल्या अभंगातून वारकऱ्यांसाठी आचारधर्म कसा असावा याचे मार्गदर्शन केले तसेच चांगले वागण्याबद्दल उपदेशही केले. ईश्वर प्राप्तीसाठी तसेच संत होण्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचे बंधन नसून फक्त शुद्ध आचरणाने संत पदाला पोहोचता येते. नामदेवांच्या पूर्वीपासून श्री विठ्ठल मंदिरात एकादशीला भक्त जमत होते परंतु दिंडी घेऊन चालत येण्याचे वारीची परंपरा नामदेवांनी सुरू केली. एकंदरीत नामदेवांनी महाराष्ट्राचा नवा आचारधर्म घडविण्याचे काम केले.

Read more : sant namdev information in marathi

 संत नामदेवांनी आपल्या कार्यकाळात पाच तीर्थयात्रा केल्या. यापैकी 1298 ते 1304 या कालावधीत त्यांनी दोन तीर्थयात्रा उत्तर भारतात केल्या होत्या. ते द्वारका, मारवाड, हरिद्वार, ज्वालापूर या मार्गे पंजाबमध्ये गेले होते. उत्तर भारतात निर्गुण मताचे प्रवर्तक म्हणून नामदेवांना ओळखले जाते. कबीरांवरही नामदेवांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. तसेच गुजरातचे कवी नरसी मेहता यांच्या कवितेवरही नामदेवांचा प्रभाव दिसून येतो. शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यामध्ये नामदेवांची 61 पदे संग्रहित करण्यात आली आहेत. आजही पंजाब, राजस्थान, जम्मू, दिल्ली या परिसरात नामदेवांची मंदिरे आढळतात. तसेच नामदेवांनी दक्षिण भारतातही तीर्थयात्रा करून तेथेही भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचे काम केले होते. त्यांच्या दक्षिण भारतातील कार्याचा प्रभाव तेनाली रामकृष्ण या राजकवीच्या काव्यावर असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे संत नामदेव हे एकमेव वारकरी संत होते.

 संत नामदेव यांचे शिष्य

 संत नामदेव यांचे बरेच शिष्य असले तरी त्यापैकी तीन त्यांचे माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. यापैकी नामदेवांची सगळ्यात प्रभावी शिष्य म्हणजे संत जनाबाई होय. संत जनाबाई या नामदेवांच्याच घरी लहानाच्या मोठ्या झाल्याने त्यांनी नामदेवांना अत्यंत जवळून पाहिले होते. त्यांनी आपल्या अभंगात अभंगात बंडखोर भाषा वापरली आहे. नामदेवांचा दुसरा शिष्य म्हणजे संत चोखामेळा होय. संत चोखामेळा यांचे स्थान वैदिक धर्मात अस्पृश्य म्हणून होते. पुढे जाऊन या संत चोखामेळा यांनी वैदिक धर्मावर ताशेरे ओढण्याचे काम केले. तिसरा महत्त्वाचा शिष्य म्हणजे संत परीसा भागवत होय. भागवत हे जन्माने ब्राह्मण होते. त्यांना आपण नामदेवांची बरोबरी करू शकणार नाही हे जाणवल्यानंतर त्यांनी नामदेवांचे शिष्यत्व पत्करले. अशा प्रकारे येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते की नामदेवांचा प्रभाव समाजातील सर्व स्तरातील लोकांवर होता.

निधन 

 नामदेव यांच्या निधना बाबत विविध मतांतरे आहेत. या वादविवादात न पडता वारकरी संप्रदायाच्या मतानुसार  3 जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे संत नामदेव पांडुरंग चरणी विलीन झाले असे मानूया. 

अशा प्रकारे संत नामदेव माहिती मराठी ( Sant Namdev Information in Marathi)  या लेखातून आपण संत नामदेव यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांच्या वारकरी क्रांतीचे प्रणेते संत नामदेव या पुस्तिकेवर आधारित आहे. माहिती आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. तसेच आपणास ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यास आवडेल ते कळवा. त्यावरती pocketbiography.com ची टीम नक्कीच काम करेल. धन्यवाद!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top