भारतीय क्रीडा इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक इव्हेंट मध्ये पहिले पदक मिळवून देणारे, महान कुस्तीपटू पै. खाशाबा जाधव(Khashaba Jadhav) हे नाव आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे. याआधी फक्त हॉकी या सांघिक खेळात भारताला ऑलिम्पिक पदक मिळाले होते. वैयक्तिक खेळात सर्वप्रथम खाशाबा जाधव यांनी ब्रॉन्झ पदक मिळविले. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा सुखकर नव्हता. अनेक आव्हाने, चढ उतार पार करत जिद्दीने खाशाबा यांनी यशाचे शिखर सर केले. चला तर जाणून घेऊया खाशाबा जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास…..
जन्म
खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोलेश्वर या गावी 15 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांचे वडील दादासाहबे जाधव हे एक सुप्रसिद्ध पैलवान होते. दादासाहेबांना एकूण 5 अपत्ये होती. यापैकी सर्वात लहान हे खाशाबा होते. खाशाबांचा आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांचे कुटुंबीय शेती करत होते. तसेच दादासाहेब गावातील तरुणांना कुस्ती शिकवायचे. त्यामुळे लहानपणापासूनच खाशाबा यांच्यावर कुस्तीचे संस्कार झाले व त्यांच्यात कुस्तीप्रति प्रेम निर्माण झाले. तसेच त्यांची आई अत्यंत साधी, शांत, प्रेमळ स्वभावाची असल्याने हे गुणही त्यांच्यात ओघाने आले होते.
बालपण ( Khashaba Jadhav)
लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने शालेय जीवनात त्यांनी भारोत्तलन( Weightlifting), पोहणे, धावणे, आणि मलखांब या सारख्या खेळात विशेष प्राविण्य मिळवले होते. तसेच वडील स्वतः कुस्तीचे वस्ताद असल्याने वयाच्या 5 व्या वर्षी पासून खाशाबा कुस्ती खेळू लागले होते. कुठे कुस्तीचे मैदान असेल तर ते बघायला आवर्जून जात. वयाच्या 8 व्या वर्षी 1934 साली ते रेठरे मैदानात पहिली कुस्ती खेळले आणि त्यावेळच्या कुस्तीच्या चॅम्पियन ला 2 मिनटात अस्मान दाखवले होते. तिथून त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी 1942 च्या छोडो भारत चळवळीत देखील सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी क्रांतिकारकाना लपण्यासाठी जागा देणे, ब्रिटिश सरकारविरुद्ध परिपत्रके फिरवणे यासारखी कामे केली होती. (Khashaba Jadhav)
शिक्षण
कुस्तीत प्राविण असणारे खाशाबा अभ्यासात देखील हुशार होते. कुस्तीमुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कोणतीही बाधा आली नव्हती. खाशाबा यांनी शालेय शिक्षण टिळक विद्यालय, कराड येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रवेश घेतला (1948-1954) आणि इथूनच त्यांचा कुस्तीमधला औपचारिक प्रवास सुरु झाला.
कारकीर्द
राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर खाशाबा यांनी महाविद्यालयीन, विद्यापीठाच्या विभागीय, अंतरविभागीय, स्पर्धेत सहभाग घेऊन त्यात यश मिळवले. खाशाबा यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 1947 रोजी ऑलिम्पिक मध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याचा निश्चय घेतला होता. त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय पातळीवर देखील मोठे यश मिळवले आणि ऑलिम्पिकसाठी पात्र झाले. पण त्यावेळी खेळासाठी स्पॉन्सर, खेळाचे वाणिज्यकरण यासारख्या गोष्टी नसल्यामुळे खाशाबा यांना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे अवघड झाले होते. त्यांनी मित्र, नातेवाईक, गावकरी, कोल्हापूरचे छत्रपती यांच्याकडून आर्थिक मदत घेतली. आर्थिक बाबीव्यतिरिक्त परदेश वारी, मॅट वरची कुस्ती, आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम देखील खाशाबा यांच्यासाठी नवीन होते.
या सगळ्यावर मात करून खाशाबा यांनी 1948 च्या ऑलिम्पिक मध्ये 52 किलो फ्लायव्हेट कॅटेगरीमध्ये सहभाग घेतला. पण मॅट ची कुस्ती त्यांच्यासाठी नवीन असल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही ते त्यावेळी वैयक्तिक इव्हेंट मधील 6 व्या स्थानापर्यंत पोहचणारे भारतातील पहिले खेळाडू होते. यावेळी त्यांचे राजाराम महाविद्यालयातील प्रशिक्षक प्रा. गोविंद पुरंदरे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच ऑलिम्पिक साठी फंड मिळवून देण्यासाठी शहाजी लॉ महाविद्यालयाचे प्रा. दाभोळकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवले होते.
खाशाबा (Khashaba Jadhav) यांनी 1948 च्या ऑलिम्पिकमुळे निराश न होता 1952 च्या ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतला. आणि यावेळी त्यांनी कॅनडा, मेक्सिको, आणि जर्मनी च्या कुस्तीपटुना अस्मान दाखवून ऐतिहासिक कामगिरी केली. खाशाबा यांनी ब्रॉन्झ पदक मिळविले. तो दिवस होता 23 जुलै 1952. वैयक्तिक इव्हेंट मध्ये ऑलिम्पिक पदक मिळविणारे खाशाबा यांनी भारतातील पहिले खेळाडू होण्याचा मान मिळविला. पदक जिंकून आल्यानंतर गावकर्यांनी मोठ्या जल्लोषात खाशाबा यांची मिरवणूक काढली. प्रा. दाभोलकर यांनी गहाण ठेवलेले घर परत घेण्यासाठी खाशाबा यांनी कुस्तीच्या स्पर्धा भरवून त्यातून मिळालेली रक्कम दाभोळकर सरांना दिली होती. यातून खाशाबा यांची उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते. 1953 मध्ये जपानचे कुस्तीपटू भारतात स्पर्धेसाठी आले होते. तेव्हा देखील खाशाबा यांनी जपानच्या चॅम्पियनला अस्मान दाखवले होते.
ऑलिम्पिकच्या विजयानंतर खाशाबा यांना 1955 मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर ची पोस्ट मिळाली व ते पोलीस दलात रुजू झाले. पण ही नोकरी मिळवण्यासाठी त्यांना सरकारदरबारी प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. पोलीस खात्यात असताना देखील त्यांनी कुस्ती सोडली नव्हती. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कोच म्हणून देखील काम केले. खाशाबा यांनी एकूण 27 वर्षे पोलीस दलात सेवा बजावली. त्यांची असिस्टंट पोलीस कमिशनर पदी बढती होऊन ते निवृत्त झाले. (Khashaba Jadhav)
निधन
देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिकूनही खाशाबा यांची पुरेसी दखल शासनाने घेतली नव्हती. खाशाबा यांना सरकारी सहायता देखील खूप कमी मिळाली होती. पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन साठी झगडावे लागले. त्यामुळे त्यांचे शेवटचे दिवस हलाखीत गेले. यातच 1984 मध्ये कराड येथे रस्ते अपघातात खाशाबा यांचा मृत्यू झाला.
Read More Information about Khashaba Jadhav
पुरस्कार व गौरव
1) दिल्ली येथे 1982 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये टॉर्च रनचा भाग बनवून खाशाबा यांचा गौरव करण्यात आला होता.
2) एका नामवंत संस्थेकडून खाशाबा यांना 1983मध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
3) 1992-93 मध्ये महाराष्ट्र सरकारने खाशाबा यांना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार दिला.
4) 2000 मध्ये खाशाबा यांना भारत सरकारने मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
5) 2010 मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती संकुलाला खाशाबा यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला गेला.
6) गूगलने 15 जानेवारी 2023 रोजी खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गूगल डूडलद्वारे सन्मानित केले.
7) खाशाबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
8) परंतु खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. या गोष्टीची सर्व क्रीडाप्रेमीना खंत वाटते.
समारोप
खाशाबा यांचे जीवन जाणून घेतल्यानंतर लक्षात येते की एका सामान्य कुटुंबातील मुलगा संसाधनाचा अभाव असतानाही देशाला इतिहासातील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देतो. ही कथा खरंतर त्यांच्या जिद्दीची, प्रचंड मेहनतची आहे. ज्याकाळी मॅटवरील कुस्ती फारशी परिचित नसताना देखील हार न मानता जिद्दीने उभे राहून खाशाबा यांनी ऑलिम्पिक पदक मिळविले होते. त्यांच्या जीवनचरित्रातून ध्येयाप्रती असणारी निष्ठा, चिकाटी, हार न मानण्याची वृत्ती, कठीण प्रसंगात धीराने सामोरे जाण्याची क्षमता इ. अनेक गुण शिकण्यास मिळतात. खाशाबा यांचे चरित्र आजच्या भरकटत जात असलेल्या तरुणाई एका मार्गदर्शक आहे. पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन करून लेखाचा शेवट करूया. अशाप्रकारची प्रेरणादायी चरित्रे वाचण्यासाठी pocketbiography.com ला subscribe करा. आणि तुमच्या सूचना देखील कंमेंट च्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष contact form च्या मदतीने आमच्यापर्यंत पोहचवा. धन्यवाद!!!!
Pingback: स्वप्नील कुसळे यांची माहिती : Swapnil Kusale Biography in Marathi - Pocket Biography