भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, अग्रदूत, क्रांतिज्योती, पहिल्या महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची माहिती यांची लेखातून घेणार आहोत. सावित्रीबाई फक्त शिक्षिका नसून त्या समाजसुधारक, मराठी कवयित्री आणि भारतातील स्त्री मुक्ती चळवळीतील प्रणेत्या होत्या. आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी, उद्धारासाठी आयुष्यभर निर्भीडपणे कार्य करत राहिल्या. त्यांच्या दूरदृष्टीचे आणि परिश्रमाचे फळ म्हणजे आजची विकसित, सुशिक्षित स्त्री आहे. भारतीय स्त्री चळवळीतील क्रांतिकारी योगदानामुळे सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती संबोधून त्यांचा गौरव केला जातो. अशा महान स्त्री व्यक्तिमत्वाच्या जीवनचरित्राचा आढावा या लेखातून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया सावित्रीबाई फुले यांची माहिती……
प्रारंभिक जीवन
सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील नायगावचे पाटील होते. तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाईना सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती अशी तीन भावंडे होती. सावित्रीबाई लहानपणापासूनच धाडसी, हुशार आणि निर्भीड होत्या. तसेच त्या खेळात, पोहण्यात, नेमबाजीत देखील तरबेज होत्या. सावित्रीबाईना लहानपणापासून शिक्षणाचे आकर्षण होते. तत्कालीन समाजव्यवस्थेत स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यामुळे विविहापूर्वी त्यांना शिक्षणाची आवड असतानाही शिक्षण घेता आले नाही. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी विवाहाआधी दिलेले पुस्तक त्यांनी जपून ठेवले होते. व लग्नानंतर त्या सोबत घेऊन गेल्या होत्या. यावरून त्यांनी शिक्षणाची आवड, पुस्तकांवरील प्रेम दिसून येते.
Buy : Savitribai Phule Biography Book
विवाह
सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी 1840 मध्ये ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. यावेळी ज्योतीरावांचे वय देखील अवघे 13 वर्ष होते. ज्योतीराव मुळचे कटगुण(ता. खटाव जि. सातारा) गावचे होते. त्यांचे आडनाव गोरे होते पण पुण्यातील फुलबागेची बक्षीसी पेशव्याकडून मिळाल्यानंतर त्यांना फुलांच्या व्यवसायामुळे फुले हे आडनाव मिळाले. त्यामुळे लग्नानंतर सावित्रीबाईचे नाव सावित्रीबाई ज्योतीराव फुले असे झाले.
शिक्षण
सावित्रीबाईंना लग्नाआधीपासून शिक्षणाची आवड होती. त्यांना त्यांची आवड जपण्याची शिक्षण घेण्याची संधी लग्नानंतर मिळाली. त्यावेळी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय नसल्याने ज्योतीरावांनी त्यांना घरीच प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतर पुढील शिक्षण ज्योतीरावांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भवळकर यांच्याकडून मिळाले. तसेच सावित्रीबाईंनी अहमदनगर आणि पुणे येथून अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले.
See More : Ahikyabai Holkar Biography
शैक्षणिक कार्य
सुरुवातीला ज्योतीरावांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिक होत्या. यावेळी समाजातील धर्ममार्तंडानी सावित्राबाईंना ‘धर्मबुडवी’ घोषित करून येता जाता त्यांच्यावर शेणमाती फेकली. पण लहानपणापासून धाडसी असणाऱ्या सावित्रीबाई अशा घटनापासून विचलित न होता निर्भीडपणे आपले कार्य करीत राहिल्या. कालांतराने सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन सगुणाबाई आणि फातिमा शेख या देखील त्यांच्यासोबत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. (सावित्रीबाई फुले यांची माहिती)
फुले दांपत्याने एकूण 18 शाळा सुरु केल्या होत्या. त्यांच्या शाळेत सर्व जातीधर्माच्या मुलामुलींना प्रवेश दिला जाई. तसेच त्यांनी 1856 मध्ये पहिले नेटिव्ह ग्रंथालय देखील सुरु केले होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या फलश्रुतीचे उदाहरण द्यायचे झाले तर ताराबाई शिंदे यांचे दिले जाऊ शकते. सावित्रीबाईंच्या कार्याने प्रभावित होऊन स्त्रियांच्या भीषण परिस्थितीचे वास्तव मांडणारा स्त्री- पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. तसेच त्यांच्या शाळेतील मातंग समाजातील मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने मांग महाराच्या दुःखाविषयी लिहिलेला निबंध ज्ञानोदय वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. थोडक्यात सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्यातून स्त्री वर्गात जागृती होऊ लागली होती. त्यांच्यात आत्मविश्वास येत होता.
विधवा स्त्रियांसाठी कार्य
सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणासोबतच स्त्रियांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी देखील प्रयत्न केले. फुले दांपत्याने विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांनी याच गृहातील एका विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेऊन त्याला यशवंत असे नाव दिले.
तसेच पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची चाल समाजात रूढ होती. ही एक त्या काळातील दुष्ट प्रथा होती म्हणून सावित्रीबाईंच्या प्रेरणेने ज्योतीराव फुले यांनी पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणला. आणि केशवपण न करण्याचे आवाहन केले. (सावित्रीबाई फुले यांची माहिती)
त्याकाळी विधवा विवाह करण्यास मान्यता नव्हती. परंतु बालविवाह होत असल्याने तरुणपणातच स्त्रियांना विधवापण येत होते. त्यामुळे त्यांची स्थिती शोषणीय होत असे. हे जाणून फुले दांपत्याने विधवा विवाहाचे समर्थन व बालविवाहास विरोध केला.
तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना करून ब्राम्हणाशिवाय व हुंडा न घेता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा मार्ग दिला. याच पद्धतीने त्यांनी आपला मुलगा यशवंत याचा विवाह ज्ञानोबा ससाणे यांच्या मुलीशी म्हणजे राधाशी करून दिला. विशेष म्हणजे हा विवाह आंतरजातीय होता. या विवाहाने समाजातील जातीभेद नाहीसा करण्याच्या दृष्टीने केलेली सुरुवात होती.
Read More About Savitribai Phule
इतर कार्य
1890 मध्ये ज्योतीराव फुले यांच्या निधनानंतर समाजकार्याची क्रांतिकारी सत्यशोधक चळवळ पुढे चालू ठेवली. 1893 मध्ये झालेल्या सत्यशोधक चळवळीच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्थान भूषविले होते. दुष्काळी परिस्तिथीत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अन्नछत्रे सुरु केली होती. पुण्यातील 1897 च्या प्लेगच्या साथीत प्लेगच्या रुग्णांची जीवावर उदार होऊन सेवा केली. (सावित्रीबाई फुले यांची माहिती)
अशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासोबत समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी कार्य केले. यासाठी कोणत्याही परिणामांचा विचार न करता फक्त लोककल्याणाच्या विचाराने संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पित केले होते. महात्मा ज्योतीराव फुले यांच्यासोबत स्त्रीशिक्षण, जातीअंताची चळवळ आणि स्त्री सुधारणा चळवळीत मोलाचे योगदान दिले.
सावित्रीबाई फुले यांचे साहित्य
सावित्रीबाई फुले या उत्तम अशा लेखिका आणि कवयित्री होत्या. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले होते. एक 1854 मध्ये काव्यफुले या नावाने आणि दुसरा 1892 मध्ये बावणकाशी सुबोध रत्नाकर या नावाने प्रकाशित झाला होता. त्यांच्या साहित्यावर ज्योतीरावांचा प्रभाव होता. त्यांच्या कवितामधून वास्तववादी चित्रण केले गेलेले आहे. 19 व्या शतकातील महाराष्ट्रातील बहुजन समाजावरील अन्यायाविरुध्दचा विद्रोह सावित्रीबाई फुले यांच्या लिखाणातून व्यक्त होतो. तसेच त्यांनी ज्योतीराव फुले यांची भाषणे देखील प्रकाशित केलेली आहेत.
निधन
1897 च्या प्लेगच्या साथीत प्लेगच्या रुग्णांची जीवावर उदार होऊन सेवा केली होती पण हे करत असतानाच सावित्रीबाईना प्लेगची लागण झाली. यातच 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले. सावित्रीबाईंच्या निधनानंतरही त्यांची सत्यशोधक चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी अनेक स्त्रियांनी योगदान दिले. हीच सावित्रीबाईंच्या कार्याची फलश्रुती आहे.
सन्मान (सावित्रीबाई फुले यांची माहिती)
1) सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याप्रति कृतज्ञता म्हणून त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून 1995 पासून साजरा केला जातो. यावेळी मुलींच्या शाळेत विविध कार्यक्रम सादर केले जातात.
2) 1983 मध्ये पुणे महानगरपालिकेने त्यांचे स्मारक बांधले.
3) 2015 मध्ये पुणे विद्यापीठचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ असे करण्यात आले आहे.
4) सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गुगलनेही 2017 मध्ये सावित्रीबाईंच्या जयंतीनिम्मिताने गुगल डूडल च्या माध्यमातून आदरांजली वाहिली होती.
5) सावित्रीबाई फुले यांच्यावर आजपर्यंत अनेक ग्रंथ लिहिले आहेत. तसेच टीव्ही मालीका आणि नाटके सादर केली आहेत.
अशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांची माहिती या लेखातून सावित्रीबाईंच्या जीवनचरित्राची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. लेख आवडला असल्यास जरूर प्रतिक्रिया द्या. तसेच अशाप्रकारचे लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या social media च्या माध्यमातून pocketbiography.com च्या परिवारात सामील व्हा. धन्यवाद!!!
Good article and courageous