आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक जयंती : Umaji Naik Jayanti 2024 (Free)

“मरावे परि क्रांतिरूपे उरावे” ही उक्ती आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते अशा नरवीर उमाजी नाईक जयंती निम्मित ( Umaji Naik Jayanti) या लेखातून आपण त्यांच्या जीवनचारित्राचा आढावा घेणार आहोत. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध अत्याचारविरुद्ध 1857 चा उठाव होण्यापूर्वी भारतात इतरही अनेक उठाव झाले होते. त्यापैकी एक रामोशी उठाव होता ज्या उठावाने सशस्त्र क्रांतीची सुरुवात झाली आणि या उठावाचे नेतृत्व उमाजीराजे नाईक यांनी केले होते. त्यांनी आपल्या उठावाद्वारे 14 वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. शिवाजी महाराजांना आदर्श मानून इंग्रजाविरुद्ध सशस्त्र बंड करणाऱ्या आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया नरवीर उमाजीराजे नाईक यांच्याविषयी……

Umaji naik jayanti
Umaji Naik Jayanti

प्रारंभीक जीवन 

उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात भिवडी या ठिकाणी झाला. रामोशी बेरड समाजातील दादोजी नाईक खोमणे हे त्यांचे वडील होते. दादोजी हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार होते. तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. उमाजी यांचे मूळ आडनाव खोमणे होते. परंतु त्यांच्या कुटुंबाकडे पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. ( Umaji Naik Jayanti)

उमाजी नाईक लहानपणापासूनच वडिलांसोबत पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम करत होते. ते बुद्धीने हुशार, शारीरिकदृष्ट्या धडधाकट, उंच होते. उमाजी यांनी वडिलांकडून दांडपट्टा, तलवार, भाला, गोफण, कुऱ्हाडी चालवण्याची कला आत्मसात केली होती. तसेच रामोशी समाजाची पारंपरिक असणारी हेर कला अवगत केली होती. उमाजी 11 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि 1802 मध्ये वंशपरंपरेने किल्ल्याच्या वतनदारींची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

इंग्रजाविरुद्ध उठावाचे(बंड) कारण 

दुसरा बाजीराव पेशवा यास 1803 मध्ये इंग्रजानी स्थानापन्न केल्यानंतर बाजीराव पेशवा इंग्रजांच्या हातातील बाहुले असल्यासारखे वागू लागला. पेशव्याने रामोशी समाजाकडे असलेली किल्ल्याच्या जबाबदारीचे परंपरागत काम काढून घेतले. तसेच त्यांची इतर वतने, जमिनी, हक्क सर्व काढून घेतले. यामुळे इतर कोणतेही उत्पनाचे साधन नसलेल्या रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. त्यातच इंग्रजाचा जनतेवर अन्याय अत्याचार वाढीस लागला होता. जनतेबद्दल सहानुभूती असलेल्या उमाजी यांना हे सहन झाले नाही. त्यांनी या अन्याय- अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्याचे ठरविले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून “परकीय लोकांना स्वराज्यावर राज्य करून देणार नाही” असा निर्धार करून आपल्या जिवलग साथीदारांना सोबत घेऊन जेजुरीच्या श्री खंडोबाचा भंडारा उधळून इंग्रजाविरुद्ध बंडाचे रणशिंग फुकले.

शहीद भगतसिंग यांचे जीवनचरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंग्रजांसमोर आव्हान (उठाव /बंड)

उमाजी नाईक यांनी गोरगरीब लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी सावकार, वतनदार लोकांना लक्ष्य केले. त्यांची संपत्ती लुटली तसेच इंग्रजांच्या खजिन्यावर दरोडा टाकून ती संपत्ती गोरगरीब गरजू लोकांमध्ये वाटू लागले. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रक्षणासाठी उमाजी नाईक हे कायम धावून जात असत. त्यामुळे स्त्रिया उमाजीना सख्या भावाचा दर्जा देऊ लागल्या होत्या. गोरगरीब लोकांना केलेल्या सहाय्यामुळे उमाजी नाईक सर्वसामान्य जनतेचे नेते झाले होते. जनता उमाजींना साथ देऊ लागली. ( Umaji Naik Jayanti)

इंगजांविरुद्ध सुरु केलेल्या उठवामुळे उमाजींना 1818 मध्ये पकडून एक वर्षाची शिक्षा दिली होती. या काळात उमाजी नाईक यांनी लिहणे- वाचणे शिकून घेतले होते. ज्याचा उपयोग त्यांना नंतरच्या काळात झाला. शिक्षा संपल्यानंतर उमाजी नाईक यांनी इंग्रजविरोधी मोहीम न थांबवता ती आणखी जोराने सुरु केली आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

Buy : Narveer Umaji Naik Biography Book

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श समोर ठेवून इंग्रजाशी लढण्यासाठी सैन्य जुळवाजुळव सुरु केली. युद्धनीतीत महाराजांची गनिमीकावा पद्धती वापरली. एका सैन्य तुकडीत जवळपास 5 हजार सैनिक ठेवले. यासाठी प्रचंड पैसा देखील पाहिजे असल्याने उमाजी नाईक इंगजांचे खजिना लुटायचे. त्यांनी 22 जुलै 1826 ला स्वतःचा जेजुरी येथे राज्याभिषेक करून राजे पदवी लावण्यास सुरुवात केली. तसेच काही राजचिन्हे देखील धारण केली. उमाजीराजेनी विभाग तयार करून प्रत्येक विभागात एक सैन्यप्रमुख आणि त्याच्यासोबत एक सैन्य तुकडी नेमून दिली. प्रभावी हेरखाते निर्माण केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती धार्मिय लोक होते.

उमाजी नाईक यांच्या कारवाया वाढल्याने इंगजांनी त्यांच्याविरुद्ध पहिला जाहीरनामा 28 ऑक्टोबर 1826 रोजी काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास 100 रु. बक्षीस व उमाजींना मदत करणाऱ्यास शिक्षा जाहीर केली. पण या जाहीरनाम्याचा काहीही फायदा झाला नाही. गोरगरिबांना मदत करणाऱ्या लोकप्रिय उमाजी नाईक यांच्याविरोधात इंग्रजाना कोणीही मदत केली नाही. म्हणून इंगजांनी बक्षीस वाढवून 8 ऑगस्ट 1827 ला दुसरा जाहीरनामा काढला. पण याचाही फारसा उपयोग झाला नाही. याच दरम्यान उमाजी नाईक आणि इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजी नाईक यांनी सैनिकांची मुंडकी कापून परत पाठविली होती. आणि सोबत धमकी दिली होती. या घटनेने इंग्रज घाबरले होते. 

यामुळे इंग्रजांनी बक्षीस दुप्पट करून तिसरा जाहीरनामा तसेच 100 एकर जमीन व 5000 रु. रोख बक्षीस ठेवून चौथा जाहीरनामा काढला. पण कोणत्याही जाहीरनाम्याचा उपयोग झाला नाही. इंग्रजांना कोणीही मदत केली नाही. उलट उमाजी नाईक यांना जनतेचा, संस्थानीकांचा पाठिंबा मिळू लागला.

उमाजीराजेंनी देखील इंग्रजांविरुद्ध 16 फेब्रुवारी 1831 रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यानुसार यूरोपियन लोकांना ठार करावे, वतनदार, संस्थानिकांनी उमाजींना पाठिंबा द्यावा, इंग्रजांच्या सैन्यात असणाऱ्या शिपायांनी उठाव करावा अन्यथा आमची शिक्षा भोगायला तयार रहा, गावांनी इंग्रजांना महसूल देऊ नये, अन्यथा गाव उध्वस्त केले जाईल, इंग्रजांची राजवट संपून न्यायाधीष्ठ राज्याची स्थापना केली जाईल असे जाहीर केले होते. थोडक्यात या जाहीरनाम्यातून स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणून या याला स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून ओळखले जाते. ( Umaji Naik Jayanti)

उमाजी नाईक इंग्रजांसमोर एक आव्हान झाले होते. धास्तावून गेलेल्या इंग्रजानी शेवटचा म्हणजे पाचवा जाहीरनामा 8 ऑगस्ट 1931 रोजी काढला आणि यानुसार उमाजी यांना पकडम देणाऱ्यास 200 एकर जमीन आणि 10,000 रु. रोख देण्याचे जाहीर केले. हे बक्षीस त्याकाळातील खूप मोठे असे होते. आणि यामुळेच अमिषाला उमाजी नाईक यांचे काळोजी नाईक व नाना चव्हाण हे दोन सहकारी बळी पडले. आणि 15 डिसेंबर 1831 रोजी इंग्रजानी धोक्याने उमाजी यांना भोर तालुक्यातील उतरोली या गावात पकडले.

Read More About Umajiraje Naik

निधन 

उमाजी नाईक यांना पकडल्यानंतर पुण्यातील एका कचेरेतील एका अंधाऱ्या खोलीत 35 दिवस कैदेत ठेवले. उमाजी नाईक यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. यानुसार 3 फेब्रुवारी 1832 रोजी वयाच्या 43 व्या वर्षी पुण्याच्या खडकमाळ येथे फाशी देण्यात आली. उमाजीराजे यांच्यासोबत त्यांचे सहकारी हरी माकजी, खुशाबा नाईक व बापू सोलस्कर यांना फाशी दिली. असे उठाव पुन्हा होऊ नये म्हणून भीती निर्माण करण्यासाठी इंग्रजानी उमाजीराजे यांना तीन दिवस झाडाला लटकवून ठेवले होते. देश स्वातंत्र्यासाठी हसत हसत विरमरण स्वीकारणारे, फाशी जाणारे पहिले क्रांतिकारक होते.

समारोप ( Umaji Naik Jayanti)

आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांच्या उठावाचे कौतुक खुद्द इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेले उल्लेख आढळतात. उमाजीराजे यांना पकडण्याची जबाबदारी असणाऱ्या कॅप्टन मँकीटोश यांनी उमाजीराजे यांची सर्व माहिती लिहून ठेवली आहे. उमाजीराजे नाईक यांचा हा लढा स्वातंत्र्यचळवळीस प्रेरणादायक ठरला. ( Umaji Naik Jayanti)

महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जन्मले क्रांतिकारी,

लढले ते वीर मराठे झुकले ना कधी इंग्रज समोरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top