डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवनचरित्र भाग 1: Dr. Babasaheb Ambedkar Biography Part 1

महामानव, अर्थशास्त्री, राज्यशास्त्री, इतिहासतज्ञ, बॅरिस्टर, संविधान निर्माते, भारतरत्न इ. अशा अनेक पदव्या धारण करणारे जगातील एकमेव व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनचरित्राचा आढावा या लेखातून घेणार आहोत. बाबासाहेबांचे चरित्र एक लेखातून जाणून घेणे हे शक्य होणार नाही. त्यासाठी पारायण घालावे लागेल आणि त्यातूनही बाबासाहेबांचे पूर्ण आयुष्याचा आढावा घेणे शक्य होईल का नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आपणही बाबासाहेबांचे चरित्र जाणून घेण्यासाठी लेखाची शृंखला तयार करून शक्य तितक्या पैलुंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. चला तर जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी (Dr. Babasaheb Ambedkar)…..

Dr. Babasaheb ambedkar thumbnail
Dr. Babasaheb Ambedkar Biography

जन्म 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू या ठिकाणी झाला. या काळात त्यांचे वडील रामजी सकपाळ या ठिकाणी लष्करी पलटणीत कामास होते. बाबासाहेबांचे मूळ नाव हे भीमराव रामजी सकपाळ होते. पण शाळेत प्रवेश घेत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांचे आडनाव गावाच्या नावावरून आंबडवेकर ठेवले. यातही पुढे बाबासाहेबांना शिकवण्यासाठी सातारा येथील शाळेत कृष्णा केशव आंबेडकर नावाचे गुरुजी होते. त्यांनी आंबडवेकर हे आडनाव उच्चारासाठी अवघड वाटत असल्याने त्यांनी त्यांचे आडनाव बाबासाहेबांना दिले आणि भीमराव रामजी सकपाळ (आंबडवेकर) हे भीमराव रामजी आंबेडकर झाले.

कुटुंब 

बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेबांचे कुटुंब हे तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावचे होते. रामजी सकपाळ हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून देखील काम करत होते. रामजी व भीमाबाई यांना एकूण 14 अपत्ये झाली. यापैकी 3 मुली व 3 मुले हयात होते. बाबासाहेब भावंडामध्ये सर्वात लहान होते. बाबासाहेब 5 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे म्हणजे भीमाबाईंचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे संगोपन हे त्यांच्या आत्याने केले. आत्याचे नाव मीराबाई होते. वयाच्या 14-15 व्या वर्षी बाबासाहेबांचे लग्न रमाबाई यांच्याशी झाले होते.  बाबासाहेबांना एकूण 5 अपत्ये होती. यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न यापैकी फक्त यशवंत हेच हयात होते. इतर 4 अपत्ये लहानपनीच दगावली.

Read More Biographical Blogs

शिक्षण 

उच्चविज्ञाविभुषित असणारे बाबासाहेब यांनी सामाजिक -आर्थिक भेदभावाचा सामना करत कधीही विरोधाला न जुमानता आपले शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन समाजात बाबासाहेब यांच्या इतके शिक्षण घेणारी व्यक्ती इतर कोणीही नव्हती. बाबासाहेब यांचे शिक्षण जाणून घेण्यासाठी त्याचे प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे दोन टप्पे करावे लागतात. (Dr. Babasaheb Ambedkar)

Buy : Dr. Babasaheb Ambedkar Biography Book

1) प्राथमिक शिक्षण 

रामजी सकपाळ यांची मध्यप्रदेश मधून सातारा कॅम्प येथे 1896 मध्ये बदली झाली. यावेळी बाबासाहेबांचे वय 5 म्हणजेच शाळेत प्रवेश घेण्याइतके झाल्याने त्यांना सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर 1900 मध्ये सातारा येथील इंग्लिश गव्हर्नमेंट हायस्कूल (सध्या प्रतापसिंह हायस्कूल) येथे प्रवेश घेतला. येथेच त्यांना आंबेडकर नाव मिळाले. 1904 मध्ये बाबासाहेबांचे सर्व कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये प्रवेश घेतला. ते येथे प्रवेश घेणारे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. यासाठी रामजी सकपाळ यांनी आपल्या लष्करी पदाचा वापर करून प्रवेश मिळविला होता. पण प्रवेश जरी मिळाला असला तरी बाबासाहेबांना इथे भेदभावाची वागणूक मिळत होती. सार्वजनिक वस्तूंचा वापर करण्यास मनाई, शिपाई नाही तर पाणी नाही, सर्वांसोबत वर्गात न बसने यासारख्या गोष्टीचा सामना करावा लागत असे.

तरी देखील बाबासाहेबांनी सर्व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून 18-18 तास अभ्यास करून एल्फिन्स्टन हायस्कूल मधून मेट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे गुरुजी केळूसकर यांनी बाबासाहेबांचे कौतुक करण्यासाठी सभा भरवली. यावेळी केळूसकर गुरुजीनी बाबासाहेबांना गौतम बुद्धांचे चरित्र भेट म्हणून दिले. या चरित्र वाचनातूनच बाबासाहेबांच्या मनात बौद्ध धर्माप्रति आकर्षण निर्माण झाले. (Dr. Babasaheb Ambedkar)

2) उच्च शिक्षण 

भारतात घेतलेले उच्च शिक्षण 

उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेल्या दरमहा 25 रु. च्या शिष्यवृत्तीने मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात 1908 साली प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात बी. ए. पदवी मिळविली आणि बडोदा संस्थानात कामासाठी रुजू झाले. 

अमेरिकेत घेतलेले शिक्षण 

बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाल्यानंतर काही दिवसातच बाबासाहेबांच्या वडिलांचे निधन झाले. अंत्यविधी उरकून परत जाण्यास उशीर झाला. त्यांचवेळी बडोदा सरकार परदेशीं शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाही केले होते. बाबासाहेबांनी याचा फायदा घेऊन बडोदा संस्थांनाकडून परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविली आणि पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठात प्रवेश घेतला. पण शिष्यवृत्तीची मुदत करारानुसार ही फक्त 3 वर्षे होती. म्हणजेच 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार होती. त्याआधी बाबासाहेबांना शिक्षण पूर्ण करून परत येणे गरजेचे होते. 

कोलंबीया विद्यापीठात बाबासाहेबांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना बाबासाहेब प्रचंड कष्ट घेत होते. ते ग्रंथालयात सर्वात आधी व ग्रंथालयातून सर्वात शेवटी बाहेर पडत. याच सुमारास त्यांची ओळख लाला लजपतराय यांच्याशी झाली होती. बाबासाहेब कोलंबीया विद्यापीठातील अर्थाशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी होते. बाबासाहेबांनी प्राचीन भारतीय व्यापार(Ancient Indian Commerce) या विषयावर प्रबंध सादर करून 1915 मध्ये कोलंबीया विद्यापीठातून एम. ए. पदवी संपादन केली. 

एम. ए. पदवी प्राप्त केल्यानंतर बाबासाहेबांनी पीएचडी पदवीसाठी भारताचा राष्ट्रीय लाभांश :इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन(The National Dividend of India: A historical and Analytical Study) या विषयावर काम सुरु केले. यावेळी त्यांचे पीएचडी मार्गदर्शक एडविन आर. के. सेलिग्मन हे होते. यांनीच या प्रबंधाची प्रस्तावना लिहिली. 1917 मध्ये कोलंबीया विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून पीएचडी पदवी देण्याचे मान्य केले. तसेच डॉक्टर देखील नावापुढे लावण्याची परवानगी मिळाली पण प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्यानंतर रीतसर पदवी दिली जाईल अशी अट घातली. त्यामुळे बाबासाहेबांना पीएचडी ही रीतसर पदवी 8 जून 1927 मध्ये प्रदान केली. बाबासाहेबांचा हा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने प्रकाशित करण्यात आला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवनचरित्र भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेत असतानाच बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया नावाचा शोधनिबंध लिहिला होता. हाच शोधनिबंध नंतर पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आला. 

अशाप्रकारे बाबासाहेबांनी शिष्यवृत्तीच्या 3 वर्षाच्या मुदतीआधी अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केले. पण पुढे लंडनला शिक्षणासाठी त्यांनी बडोदा संस्थांनाकडे 2-3 वर्षाची मुदतवाढीसाठी विनंती केली. यानुसार त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली.

Dr. Babasaheb anbedkar (source: Google)
Rare photo of Dr. Babasaheb Ambedkar (Source:- Google)

इंग्लंडमध्ये घेतलेले शिक्षण 

शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर बाबासाहेब मे 1916 मध्ये मध्ये लंडन गेले. येथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. कोलंबीया विद्यापीठातील प्राध्यापक सेलिग्मण आणि कॅनन यांनी दिलेल्या परिचयपत्रामुळे बाबासाहेबांना लंडन मध्ये शिक्षण घेण्यासाठी सोयीस्कर वातावरण झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना एम. एस्सी साठी प्रवेश मिळाला.

तसेच बाबासाहेबांनी एकाच वेळी बॅरिस्टर पदवी मिळविण्यासाठी ग्रेज इन मध्येदेखील प्रवेश घेतला.  एम. एस्सीसाठी बाबासाहेबांनी भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रिकरण ( Provincial Decentralisation of Emperial Finance) हा विषय निवडला. 

पण शिष्यवृत्तीची मुदत संपल्यानंतर त्यांना लंडन येथील शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले. आणि करारानुसार बडोदा संस्थानात नोकरी करावी लागली. पण येथे सहकारी कर्मचाऱ्यांकडून अपमानजनक व भेदभावपूर्ण वागणूक मिळत असल्याने ते नोकरी सोडून मुंबईला परत गेले. 

पुढे सामाजिक कार्याच्या माध्यमातून बाबासाहेबांची कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांशी ओळख झाली. व त्यांच्याकडून लंडनला पुन्हा जाण्यासाठी सहकार्य मिळविले आणि 1920 मध्ये लंडनला रवाना झाले. 

1917 मध्ये लंडन सोडताना बाबासाहेबांनी 4 वर्षात परत कधीही येऊन शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळविली होती. त्यानुसार 1920 मध्ये लंडनला गेल्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा प्रवेश घेऊन प्रचंड अभ्यास करून एका वर्षात 1921 मध्ये भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रिकरण ( Provincial Decentralisation of Emperial Finance) या विषयावर प्रबंध सादर केला. आणि अर्थशास्त्रातील एम. एस्सी पदवी मिळविली. तसेच 1922 मध्ये बॅरिस्टर ही पदवी देखील मिळविली.

Read More about Dr. Babasaheb Ambedkar

पुढे बाबासाहेबांनी 1922 मध्ये अर्थशास्त्रातून डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc) पदवी घेण्यासाठी लंडन विदयापीठात प्रवेश घेतला. यानुसार त्यांनी प्राब्लेम ऑफ रुपी या विषयावर प्रबंध सादर केला. पण प्रबंधात ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका केल्याने प्रबंध नाकारून तो पुन्हा लिहिण्यास सांगण्यात आले. पण जवळील पैसे संपत आल्याने भारतात येऊन प्रबंध लिहिण्याचे ठरवले. त्यानुसार निष्कर्ष न बदलता फक्त लिखाणाची पद्धत बदलून पुन्हा प्रबंध सादर केला. व यावेळी प्रबंध स्वीकारून बाबासाहेबांना 1923 मध्ये डी. एस्सी पदवी प्रदान करण्यात आली.

अशाप्रकारे कोणत्याही सामान्य व्यक्तीला हे शिक्षण घेण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागले असते तेच शिक्षण बाबासाहेबांनी कमीत कमी वेळेत पूर्ण करून असाधारण असे काम केले. यासाठी दिवसाचे 20-21 तास फक्त आणि फक्त अभ्यासाचे व्रत अंगीकारले.

या लेखातून आपण बाबासाहेबांचे प्रारंभीक जीवन आणि शैक्षणिक प्रवास जाणून घेतला आहे. पुढील लेखात त्यांच्या महान कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लेख आवडला असल्यास आणि आपल्या काही सूचना असल्यास जरूर आमच्यापर्यँत पोहचवा. धन्यवाद!!!

1 thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवनचरित्र भाग 1: Dr. Babasaheb Ambedkar Biography Part 1”

  1. Pingback: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र भाग 2 : Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi Part 2 (Free) - Pocket Biography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top