डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र भाग 2 : Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi Part 2 (Free)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र भाग 1 (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi) या लेखात आपण बाबासाहेबांच्या प्रारंभीक जीवनाचा आणि शिक्षणाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र भाग 2 (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi Part 2) या लेखात आपण बाबासाहेबांचे महान कार्य जाणून घेणार आहोत. बाबासाहेबांचे कार्य हे फक्त एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून त्यांनी स्त्रियांसाठी, शेतकरी वर्गासाठी, कामगार वर्गासाठी त्यांचा जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी, अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी महान असे कार्य केले. चला तर जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य…..

Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi

कुटुंबासाठी कार्य 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने 1922 मध्ये बॅरिस्टर पदवी घेतल्यानंतर त्यांनी अर्थाजनासाठी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. परंतु उच्च वर्गातील व्यक्ती बाबासाहेबांकडून केस लढत नसत. त्यामुळे वकिली व्यवसायातून देखील घरखर्च भागवणे अवघड असल्याने त्यांनी लॉ चे प्राध्यापक म्हणून देखील काम केले. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता बघता हळूहळू त्यांच्याकडे अनेक महत्वपूर्ण खटले येऊ लागले. बाबासाहेबांनी देखील हे खटले यशस्वीपणे लढले. आणि त्यांची यशस्वी वकिलामध्ये गणना होऊ लागली. बाबासाहेब जरी घर चालवण्यासाठी वकिली व्यवसाय करत असले तरी त्यांनी समाजकार्य सोडले नव्हते.

Buy : Dr. Babasaheb Ambedkar Biography Book

सामाजिक कार्य 

लहानपनापासून भेदभावाचा सामना करणाऱ्या बाबासाहेबांना समाजात समानता प्रस्थापित करायची होती. सर्वाना समान अधिकार असावेत. सर्व व्यक्ती समान आहेत. उच्च नीच हा भेदभाव संपला पाहिजे यासाठी बाबासाहेब अखंड कार्यरत राहिले. भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. 

बाबासाहेबांनी 1919 मध्ये अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून साऊथबारो समितीसमोर मागण्याचे निवेदन दिले. यात दलित समाजाला मतदान प्रक्रियेत स्थान मिळावे, तसेच स्वतंत्र मतदार असावेत इ. मागण्या करून त्याचा पाठपुरावा देखील केला होता.

तसेच समाजप्रबोधन करणारे एक पाक्षिक बाबासाहेबांनी शाहू महाराज यांच्या आर्थिक मदतीने 1920 मध्ये सुरु केले. यास मुकनायक असे सुयोग्य नाव दिले. या पाक्षिकातून बाबासाहेबांनी वंचित समाजाच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे तसेच सरकारला त्याबाबत उपाययोजना देखील सांगण्याचे काम केले. यांच्याबरोबर बाबासाहेबांनी सर्व समाज संघटित करण्यासाठी परिषदा, सभा देखील भरविल्या. या परिषदांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्कबाबत जागृती करण्याचे काम केले.

Muknayak Paper
मुकनायक पाक्षिक (Source: Wikipedia)

बाबासाहेबांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाची उन्नती साधण्याचे उद्धीष्ट होते. या सभेने शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरु केली. यातून समाजात शिक्षणाचा प्रसार केला गेला. तसेच सरकारकडे राजकीय प्रतिनिधीत्व मिळण्याच्या मागण्या केल्या आणि त्याचा पाठपुरावा करून मान्य देखील करून घेतल्या. त्यानुसार मुंबई कायदेमंडळात 1926 मध्ये बाबासाहेब आणि पुरुषोत्तम सोळंखी यांना नेमण्यात आले. (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi)

बाबासाहेब प्रत्यक्ष मैदानात उतरून देखील त्यांनी उच्च वर्गीय लोकांच्या विरोधाची पर्वा न करता अस्पृश्य समाजाला अधिकार मिळवून दिले. यामध्ये 1927 रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आणि मंदिर प्रवेशासाठी चळवळ सुरु केली. त्यानुसार बाबासाहेबांनी मुंबई कायदेमंडळातून सार्वजनिक पाणवठयावर पाणी भरण्याचा अधिकाराचा ठराव मंजूर करून घेतला. आणि 20 जानेवारी 1927 रोजी महाड येथील चवदार तळ्यावर आंदोलन करून तेथील पाणी प्राशन केले. एक यशस्वी आंदोलन पार पाडले. तसेच बाबासाहेबांनी हिंदू समाजातील व धार्मिक सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून सामाजिक विषमतेचे निर्मूलन करण्याचे काम केले. 

याशिवाय बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या हितासाठी, राजकीय हक्कासाठी तिन्ही गोलमेज परिषदेत सहभाग घेतला व राजकीय हक्कांच्या व स्वातंत्र्याच्या मागण्या केल्या. विशेष म्हणजे काही परिषदावर काँग्रेसने बहिष्कार टाकला असताना देखील अस्पृश्य समाज हितासाठी विरोध पत्करून बाबासाहेब सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवनचरित्र भाग 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंदिर सत्याग्रह 

अमरावती येथील अंबाबाई मंदिरात 1925 मध्ये मंदिर प्रवेश करण्याचे आंदोलन केले गेले. सतत संघर्ष करून 1928 च्या दरम्यान मंदिर देवस्थानाचे विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी सर्वांसाठी मंदिर खुले करण्याचे आवश्वसन दिले. त्याचप्रमाणे नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठीचा लढा लढला गेला. यावेळी मोठ्या प्रमाणात छळ सोसावे लागले. तरीही बाबासाहेबांनी व त्यांच्या अनुयायांनी सत्याग्रह सुरूच ठेवला. 1930 मध्ये चालू झालेला सत्याग्रह 1934 पर्यंत चालू होता. पण यश न आल्याने इथे शक्ती वाया न घालवता ती राजकीय हक्क व शैक्षणिक हक्कासाठी वापरावी या हेतूने सत्याग्रह थांबविला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काळाराम मंदिर सर्वांसाठी खुले झाले.

पुणे करार 

ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मेकडोनाल्ड यांनी 1932 मध्ये जातीय निवाडा जाहीर केला. यानुसार अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आला. त्यांना मतांचा अधिकार मान्य करण्यात आला. पण हे राजकीय हक्क महात्मा गांधी यांना मान्य नव्हते व त्यांनी पुण्याच्या येरवडा कारागृहात उपोषण सुरु केले. अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी अस्पृश्य समाज सशक्त करणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना वाटत होते व स्पृश्य लोकांच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन शक्य आहे असे महात्मा गांधी यांना वाटत होते. महात्मा गांधींनी उपोषण सुरु केल्यानंतर काँग्रसच्या नेत्यांनी बाबासाहेबांच्या भेटी घेतल्या. गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी विनंती करू लागले. बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघांची मागणी मान्य करून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली. अशी तडजोड होऊन 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला आणि गांधीजींनी उपोषण सोडले.

(शब्द मर्यादेमुळे पुणे कराराचा सविस्तर मसुदा विकीपीडिया वरती वाचू शकता.)

Read more about Dr. Babasaheb Ambedkar

स्त्रियांसाठी हक्कासाठी कार्य 

समाजाचे मूल्यमापन हे समाजातील स्त्रियांच्या स्थितीवर करता येते. असे मत बाबासाहेबांनी मांडले होते. त्यामुळे स्त्रियांच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने बाबासाहेबांनी स्त्री उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून त्यामध्ये मुलींना प्रवेश दिला. खाणीत काम करण्याऱ्या स्त्रियांना प्रसूतीचा भत्ता, प्रसूती रजा, पुरुषाइतकी मजुरी, हक्काची रजा, दुखापतीस नुकसान भरपाई, निवृत्तीवेतन यासारखे निर्णय घेतले. 

बाबासाहेब कायदामंत्री असताना 1947 मध्ये लोकसभेत हिंदू कोड बिल मांडले होते. या बिलानुसार स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, लग्नासंबंधित स्त्री- पुरुष समानता, स्त्रियांना वारसाहक्क यासारख्या तरतुदी होत्या. पण प्रतिगामी नेत्यामुळे हे विधेयकावर मतभेद झाले व बाबासाहेबानी आपला कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला.

संविधानात स्त्रियांना मतदानाचा अधिकार देऊन क्रांतिकारक निर्णय घेतला. बाबासाहेबांनी प्रत्येक चळवळीत स्त्रियांना सहभागी करून घेतले. अशाप्रकारे बाबासाहेबांचे स्त्रीविषयक कार्य एका जातीधर्माच्या स्त्रियासाठी मर्यादित नव्हते. तर समस्त स्त्रीवर्गासाठी होते. (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi)

शैक्षणिक कार्य 

” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे प्राशन केल्यांनतर तो गुरुगुरल्या शिवाय राहणार नाही” असे बाबासाहेबांचे मत आहे. शिक्षण सर्वांसाठी आहे. यावर कोणाची मक्तेदारी नाही. हे जाणून बाबासाहेबांनी कनिष्ठ जातीमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम केले. यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.

बहिष्कृत हितकारिणी सभेने शाळा, ग्रंथालये, वसतिगृहे स्थापन करून कनिष्ठ जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दलित शिक्षण संस्थेची स्थापन केली. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट दलित समाजासाठी माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करणे होते. तसेच उच्च शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची 1945 मध्ये स्थापना केली. या संस्थेने मुंबई मध्ये सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिद्धार्थ लॉ कॉलेज, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, इ. स्थापन केले व उच्च शिक्षणाची सोय केली.

राजकीय कामगिरी 

बाबासाहेबांनी 1919 पासून 1956 पर्यंत अनेक राजकीय पदे भूषविली. त्यामध्ये 1926-1936 दरम्यान बाबासाहेबांची मुंबई विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदावरून त्यांनी अनेकदा आर्थिक विषयावर विवेचन केले. भाषणे केली. यानंतर 1936 मध्ये बाबासाहेबांनी लोकशाही मूल्यांवर एक पक्ष स्थापन केला. त्यास स्वतंत्र मंजूर पक्ष असे नाव देण्यात आले. या पक्षाच्या साहाय्याने अस्पृश्य समाजाला एक ओळख निर्माण करून देण्याचे काम केले. स्वतंत्र मजूर पक्षाने 1937 च्या प्रांतीय निवडणुकात मोठे यश मिळविले. 17 पैकी 15 उमेदवार निवडून आणले. तसेच बाबासाहेब देखील यावेळी मुंबई विधानसभेचे आमदार झाले.

बाबासाहेबांनी 1942 मध्ये सर्व अनुसूचित जातींना एकत्र आणण्यासाठी ऑल इंडिया शेड्युल कास्ट्स फेडरेशनची स्थापना केली. तसेच याच कालावधीत म्हणजे 1942- 1946 दरम्यान बाबासाहेब कामगारमंत्री होते. यावेळी त्यांनी कामगारांसाठी अनेक उपाययोजना राबविल्या. (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi)

यानंतर बाबासाहेबांची 1946-1950 दरम्यान संविधान सभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. तसेच त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले गेले. (अधिक माहितीसाठी संविधान निर्मितीतील योगदान हा मुद्दा पहा.)

बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री होते. 1947-1951 दरम्यान त्यांनी कायदमंत्री पद भूषवीले. हिंदू कोड बिलावरून मतभेद झाल्यानंतर बाबासाहेबांनी ऑक्टोबर 1951 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 1952 मध्ये बाबासाहेबांची राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली. 1952-1956 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. याच दरम्यान बाबासाहेबांनी 1956 मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्याजागी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा केली होती. पण पक्ष स्थापन होण्याआधी बाबासाहेबांचे निधन झाले. पक्षाची स्थापना त्यांच्या अनुयायांनी केली.

Read More Biographical Blogs

संविधान निर्मितीतील योगदान

बाबासाहेबांची 1946-1950 दरम्यान संविधान सभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. तसेच त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले गेले. बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेऊन जगातील सर्वात सुंदर आणि आदर्श राज्यघटना निर्माण करण्याचे काम केले. यासाठी त्यांनी जवळपास 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला. अवघ्या 145 दिवसात बाबासाहेबांनी मसुदा तयार केला.संविधानात समाजातील सर्व घटकांना स्थान, अधिकार दिले गेले. स्वतंत्र भारताला एक दिशा देणारे संविधान निर्माण केले गेले. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने तयार झालेल्या संविधानामुळे जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा भारत देश प्रगतीपथावर आहे. बाबासाहेबांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi)

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी केलेले कार्य 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या मिळविल्या आहेत. ते एक अर्थशास्त्रज्ञ होते. औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करू शकतात असे मत बाबासाहेबांनी मांडले होते. 1935 मध्ये भारतीय रिझर्व बँक स्थापन होण्यामध्ये बाबासाहेबांचे योगदान होते. बँक स्थापन होताना बाबासाहेबांनी चलनाचे सुवर्ण विनिमय पद्धतीवरील मांडलेले विचार देखील महत्वपूर्ण होते.

बाबासाहेब कायदामंत्री असताना 1951 मध्ये पहिल्यांदा भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली होती. बाबासाहेबांच्या कर निर्धारणावरील प्रबंधाच्या आधारे भारतीय करनिर्धारण आणि केंद्र व राज्यातील उत्पन्नचे वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले होते. 

कृषी आणि शेतकऱ्यासाठी केलेले कार्य 

बाबासाहेब यांच्या विचारनुसार ग्रामीण भागातील जातीआधारित समाजाचे कारण ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आर्थिक विषमता जातीय व्यवस्थेला पोषक असते. त्यामुळे आर्थिक विषमता कमी करण्यासाठी शेतीचा विकास होणे गरजेचे आहे. शेतीसाठी पाणी आवश्यक असते त्यामुळे बाबासाहेबांनी जल व्यवस्थापनासाठी विचार मांडून उपाययोजना केल्या. त्यांच्या विचारांचे फलित म्हणजे दामोदर खोरे परियोजनेसारख्या योजना आहेत. तसेच शेतीसाठी कायदे करण्याची संकल्पना देखील मांडली. बाबासाहेबांनी खोती पद्धत बंद करण्यासाठी संघर्ष करून 1937 मध्ये बंद केली. तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेची संकल्पना मांडली होती.

समारोप (Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi)

ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र भाग 1 ( Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi Part 1) या लेखात म्हटले आहे की, बाबासाहेबांचे चरित्र जाणून घेण्यासाठी पारायण घालावे लागेल. तेच अनुभवायला येत आहे. बाबासाहेबांच्या चरित्राचा आढावा अत्यंत संक्षिप्त रूपात घेत असूनही ते 2 लेखात पूर्ण होत नाही. प्रारंभीक जीवन, शिक्षण, कार्य मांडून देखील अजूनही त्यांचे धार्मिक कार्य, त्यांच्या विचारांचा भारतावरील प्रभाव, त्यांचा वारसा, त्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान अशा बऱ्याच पैलुंचा आढावा घेणे बाकी आहे. ते आपण भाग 3 मध्ये पाहूया. आपण सर्व असेच आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद!!!

1 thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र भाग 2 : Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi Part 2 (Free)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top