हातात कोणत्याही प्रकारचे शस्त्र न घेता अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेला हद्दपार करून लावणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी होय. आजच्या या लेखातून महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात असेल. महात्मा गांधींच्या कार्यामुळे त्यांना भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. त्यांनी आपल्या आचरणातुन सत्य, अहिंसा ही तत्वे संपूर्ण हयातभर जपली. याच तत्वावर आधारित त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ देखील चालवली. त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले. त्यांचे हे सर्व कार्य आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती….
प्रारंभिक जीवन
2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी एका प्रतिष्ठित कुटुंबात मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. गांधीजींचे आजोबा आणि वडील हे दिवाण होते. आजोबा उत्तमचंद गांधी हे पोरबंदर संस्थानाचे दिवाण तर वडील करमचंद गांधी हे राजकोट संस्थानाचे दिवाण होते. गांधीजींच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्या अत्यंत धार्मिक होत्या. त्या आपल्या मुलांना धार्मिक कथांद्वारे सदाचाराचे धडे देत असत. त्यामुळे गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या या संस्कारांचा मोठा प्रभाव झालेला जाणवतो. विशेषतः अहिंसा व सहिष्णुता सारखी तत्वे त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजली होती. आईंनी सांगितलेल्या कथांपैकी श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन व्यक्तिमत्त्वांचा गांधीजींच्या मनावर प्रभाव होता हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहे. (महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती)
महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
विवाह
तत्कालीन प्रचलित बालविवाहाच्या प्रथेनुसार वयाच्या तेराव्या वर्षी इसवी सन 1883 मध्ये कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर मोहनदास करमचंद गांधी यांचा विवाह झाला. त्या काळातील प्रथेनुसार कस्तुरबा वयात येईपर्यंत त्यांच्या माहेरीच होत्या. गांधीजींच्या विवाहाच्या प्रक्रियेत त्यांचे शालेय शिक्षणातील एक वर्ष वाया गेले होते. गांधीजी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या लग्नाच्या आठवणी सांगतात की त्यांच्यासाठी लग्न म्हणजे नवीन कपडे परिधान करणे व गोड पदार्थ खाण्यास मिळणे इतकेच होते. गांधीजी व कस्तुरबा यांना हरिलाल, मनीलाल, रामदास व देवदास अशी चार मुले होती. गांधीजींच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्याबरोबर समाजसेवेचे तसेच राष्ट्रसेवेचे कार्य कस्तुरबा यांनी देखील केले आहे.
शिक्षण
मोहनदास करमचंद गांधी यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले. तसेच त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण राजकोट येथून पूर्ण केले. शालेय शिक्षण घेतल्यानंतर इसवी सन 1888 मध्ये म्हणजेच वयाच्या 19 व्या वर्षी ते वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी लंडन, इंग्लंडला गेले. येथे त्यांनी इनर टेम्पल कॉलेजमधून 1891 मध्ये कायद्याची पदवी घेऊन ते बॅरिस्टर झाले आणि त्यानंतर भारतात परतले. लंडनला जाण्यापूर्वी 1885 मध्ये त्यांच्या वडिलांचे व ते लंडनमध्ये असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यानंतर गांधीजींनी मुंबईमध्ये वकिली व्यवसायास सुरुवात केली. परंतु यामध्ये त्यांचा जम बसत नव्हता. आणि याच वेळी गुजरातचे व्यापारी अब्दुल्ला यांनी गांधीजींशी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या व्यवसायाच्या प्रकरणासंबंधी दक्षिण आफ्रिकेत नेण्यासाठी एक वर्षाचा करार केला व त्यानुसार 1893 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले. (महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती)
लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कार्य
1) दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींचे कार्य
1893 पासून पुढे जवळपास 21 वर्षे म्हणजेच 1915 पर्यंत गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य होते. दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर त्यांना तिथे वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. त्या घटनेचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला व त्यांनी तेथील वर्ण देशाविरुद्ध लढा उभारण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी दक्षिण आफ्रिकेत 22 मे 1894 रोजी नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि वर्ण वर्णद्वेषा विरुद्ध संघर्ष सुरू केला. अल्पावधीतच गांधीजी लोकप्रिय नेते बनले. त्यांनी इंडियन ओपिनियन वृत्तपत्र सुरू करून लोकांपर्यंत जागृतीचे संदेश पोहोचवण्यास सुरुवात केली. सार्वजनिक फंड गोळा केले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाची चळवळ उभारली. यामध्ये त्यांना कारावास ही भोगावा लागला. परंतु आपल्या ध्येयापासून मागे न हटता त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना अधिकार मिळवून दिले. व त्यानंतर गांधीजी 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले. (महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती)
2) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींचे कार्य
1915 मध्ये गांधीजी भारतात परतल्यानंतर त्यांनी लगेच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न होता भारतातील परिस्थिती समजून घेण्यासाठी भारत भ्रमंती केली. अहमदाबाद येथील साबरमती तीरावर 25 मे 1915 रोजी सत्याग्रह आश्रम स्थापन केला. 1917 मध्ये बिहार मधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांवरील अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवून तेथे सत्याग्रह करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर अहमदाबाद येथील गिरणी कामगारांच्या लढ्यात सहभागी होऊन संप घडवून आणला आणि कामगारांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. तसेच खेडा येथील शेतकऱ्यांवर दुष्काळ पडला असताना ही त्यांच्याकडून जबरदस्तीने कर गोळा केला जात होता. त्याविरुद्ध कर बंदीची चळवळ करून शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेतला.
अशाप्रकारे भारतातील विविध भागातील लोकांच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी प्रारंभी कार्य केले. त्यामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध येऊ लागले. त्यानंतर 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे गांधीजींच्या हातात आली व त्यांनी सक्रियपणे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी देशव्यापी असहकार चळवळीची सुरुवात केली. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार, देशभर सभा, आंदोलने, प्रभात फेऱ्या असा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. परंतु 1922 मध्ये चौरी चौरा येथे घडलेल्या हिंसक घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली. यामध्ये गांधीजींना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शिक्षा देखील ठोटाविण्यात आली. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना सोडण्यात आले.
त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घेतली. त्यांनी साबरमती ते दांडी असा प्रवास करून 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह घडवून आणला. शेवटी 1931 मध्ये गांधी आयुर्विन करार झाल्यानंतर ही चळवळ मागे घेतली. अशा प्रकारच्या गांधीजींनी दोन महत्त्वपूर्ण चळवळी घडवून आणल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर 1942 रोजी छोडो भारत आंदोलन उभारून तात्काळ स्वातंत्र्याची मागणी केली. व भारतीयांना करो या मरो हा मूलमंत्र दिला. संपूर्ण भारतभर या आंदोलनाचे लोन पसरले. भारतीय नेत्यांना दडपशाही करून सरकारकडून अटक करण्यात आल्या. परंतु लोकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल हे जाणून गांधीजींची सुटका करण्यात आली.
याच दरम्यान 1946 मध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वराज्याची योजना तयार केली व गांधीजींच्या आंदोलनाला यश आले. परंतु मुस्लिम लीगच्या मागणीने भारताचे फाळणी घडवून आणणारी योजना सादर झाली व अखंड हिंदुस्थानचे भारत व पाकिस्तान असे विभाजन करण्यात आले. 3 जून 1947 रोजी भारताच्या फाळणीची योजना मान्य केली गेली व त्यानंतर संपूर्ण भारतभर हिंदू मुस्लिम दंगल सुरू झाली.
महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
निधन
हिंदू मुस्लिम दंगली थांबवण्याच्या प्रयत्नात गांधीजी कार्य करत असताना 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेत गांधीजींवर नथुराम गोडसे यांनी गोळ्या झाडून त्यांचे हत्या केली. पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे केल्याचा राग त्याच्या मनात होता. नथुराम व त्याचा सहकारी यांच्यावर खटला चालवून त्यांना फाशी देण्यात आली. महात्मा गांधीजींची समाधी राजघाट येथे बनवण्यात आली आहे. त्यावर गांधीजींनी उच्चारलेले शेवटचे शब्द “हे राम” कोरण्यात आले आहेत. परंतु हे शब्द गांधीजींनी उच्चारले आहेत की नाही यावर वाद विवाद आहेत.
अशाप्रकारे या लेखातून महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शब्द मर्यादेमुळे महात्मा गांधीजींचे कार्य तपशीलवार मांडता आले नाही. तसेच त्यांच्या सामाजिक कार्यावरही प्रकाश टाकता आला नाही. परंतु यावरती माहिती देणारा लेख येणाऱ्या काळात प्रकाशित केला जाईल. तसेच त्यामध्ये त्यांच्या तत्वाविषयी ही तपशीलवार माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. वरील माहिती आवडली असल्यास जरूर प्रतिक्रिया द्या. तसेच तुम्हाला कोणाबद्दल माहिती जाणून घेण्यास आवडेल ते आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर नक्कीच माहिती घेऊन येऊ. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहूद्या. धन्यवाद!!!